धाराशिव (प्रतिनिधी):
मातंग समाजातील अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचे कार्य बहुजन रयत परिषद धाराशिव जिल्हा टीमने केले आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेश अध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे यांच्या सूचनेनुसार व प्रदेश सरचिटणीस श्री. ईश्वर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी हा उपक्रम पार पडला.
धाराशिव जिल्ह्यातील देवळाली (ता. कळंब) येथे मातंग समाजातील एका मुलीवर अन्याय-अत्याचार झाल्यानंतर त्या कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी होऊ शकली नव्हती. या कुटुंबाची व्यथा ओळखून बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, सांत्वन केले आणि दिवाळी किराणा किट देऊन दिवाळीचा गोडवा अनुभवण्याची संधी दिली.
यापूर्वी दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी बहुजन रयत परिषदेच्या प्रयत्नातून शिराढोण पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीला अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात परिषदेचे मोलाचे योगदान राहिले आहे.
या सामाजिक उपक्रमावेळी प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मिना धावरे, श्रीमती आम्राताई माने, युवक जिल्हाध्यक्ष दादा पारधे, सौ. प्रफुल्लता पाटोळे, तालुका अध्यक्ष बाजीराव पाटोळे, बाळासाहेब धावरे, विक्रांत कसबे, दिलीप रसाळ, माधव खंडागळे, नागेश राऊत, अश्रुबा एडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजात न्याय, संवेदनशीलता आणि ऐक्याचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




