धाराशिव | प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षणाची सोडत जाहीर होताच नंदगाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून प्रत्येक पक्षामध्ये चाचपणीला वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे सोमनाथ गुड्डे यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मागील निवडणुकीत त्यांनी प्रबळ उमेदवार म्हणून कडवी झुंज दिली होती. त्यानंतर त्यांनी उपसरपंच म्हणून कार्य करताना दहिटणे गावात विकासकामांची नवी दिशा दिली आहे.
त्यांच्या कार्यकाळात गावात अंडरग्राउंड गटारी, पिण्याचे पाणी योजना, वीजपुरवठा आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे काम अशा विविध सुविधा पूर्ण झाल्या आहेत. सामाजिक कार्याची ओढ असलेल्या गुड्डे यांनी तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा, गावागावात झाडे लावणी, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण, तसेच यात्रा आणि उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग अशा अनेक उपक्रमांद्वारे जनतेत विश्वास संपादन केला आहे.
‘जनशुभदा फाउंडेशन’ या संस्थेमार्फत त्यांनी आरोग्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोरगरिबांना वैद्यकीय मदत, आश्रमशाळेला पिठाची गिरणी देणे, सीमावर्ती जवानांचा सन्मान, तसेच महिलांना ‘रणरागिनी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
गरीब कुटुंबातून पुढे येऊन स्वावलंबन आणि लोकसेवेचा ध्यास घेतलेल्या सोमनाथ गुड्डे यांनी बांधकाम व्यवसायातही नाव कमावले आहे. आता ते पुन्हा एकदा नंदगाव जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरले आहेत.
त्यांचा अनुभव, कार्यतत्परता आणि विकासदृष्टी लक्षात घेता नंदगाव गटातील ही निवडणूक कडवी आणि चुरशीची होणार आहे. युती होईल की नाही हे पुढील राजकीय घडामोडींवर अवलंबून असले तरी, सोमनाथ गुड्डे हे या गटातील एक भक्कम आणि आव्हानात्मक उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.




